सोलापूर म्हटलं की इथली खमंग शेंगा चटणी, पातळ कडक भाकरी, रुचकर लोणची आणि चविष्ट मसाले सगळ्यांच्या डोळ्यांसमोर येतात. या गोष्टी घेण्यासाठी सोलापूरात येणाऱ्या सर्वांची पावलं आपसूक वळतात ती म्हणजे इथले ‘मसालेकिंग’ अशी ओळख असणाऱ्या श्री. रमण कुलकर्णी यांच्या ‘कुलकर्णी मसाले’ या आउटलेटकडे!
‘कुलकर्णी मसाले’च्या जन्माची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. झालं असं की १९४७ साली सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी या गावचे कै. आबाजी रावजी कुलकर्णी हे चरितार्थासाठी सोलापूरात आले. त्यांनी कुलकर्णी घराण्यातील तूप आणि लोणी विक्रीचा पहिला व्यवसाय सुरू केला. ‘कुलकर्णी मसाले’ नावाच्या वटवृक्षाचं हे बीजारोपण होतं.
१९६० च्या सुमारास त्यांचे सुपुत्र कै. पंढरीनाथ आबाजी कुलकर्णी यांनी आपली पत्नी कै. इंदिरा पंढरीनाथ कुलकर्णी यांच्या मदतीने व्यवसायवृद्धीसाठी पाऊल टाकलं. ‘स्वाती आस्वाद भांडार’ या नावाने घरगुती वापरासाठीची लाल मिरची पावडर, हळद पावडर, मेतकूट, कांदा लसूण मसाला अशी काही निवडक उत्पादने तयार करून विक्री करण्यास या दांपत्याने सुरुवात केली.

त्या काळात बाहेरून मसाले विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल नसायचा. तरीदेखील तुटपुंज्या भांडवलाच्या बळावर हा डोलारा सांभाळण्याचं सोलापूरातील पहिलं धाडस या दांपत्याने केलं आणि यातूनच ‘कुलकर्णी मसाले’ची मुहूर्तमेढ रोवली गेली.
श्री. रमण आणि सौ. धनश्री यांच्या रूपाने आत्ता कुलकर्णी परिवाराच्या चौथ्या पिढीने ह्या व्यवसायात स्वतःला झोकून देत ‘कुलकर्णी मसाले’ला यशोशिखरावर नेऊन ठेवलं आहे. ६३ वर्षांच्या या यशस्वी वाटचालीमध्ये श्री. रमण यांचे वडील श्री. अनिल आणि आई सौ. अनिता यांच्या कल्पकतेचा मोठा वाटा आहे.
मेहनतीने बनविलेल्या उत्कृष्ट चवीच्या उत्पादनांना लवकरच जोरदार मागणी सुरु झाली. बोलक्या स्वभावाच्या बळावर हजारो ग्राहक कायमचे जोडले गेले. इथे ग्राहकांच्या मागणीनुसार लोणची, पापड, मसाले, चटण्या, कुरवड्या, शेंगा चटणी, मेतकूट, सांडगे असे घरगुती पद्धतीने बनविलेले खमंग पदार्थ अगदी रास्त भावात मिळतात. हे युनिक आउटलेट म्हणजे मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी एक केस स्टडी ठरावी असं आहे.
‘कुलकर्णी मसाले’ या ब्रँडची चविष्ट उत्पादने चाखल्याखेरीज सोलापूर दर्शन अपूर्ण ठरतं अशी चर्चा तुम्हाला हमखास ऐकू येईल. ही उत्पादने तुम्हाला कुरिअरमार्फत तुमच्या शहरात घरपोचही मिळू शकतात. श्री. रमण कुलकर्णी यांच्याशी तुम्ही ८९२८५ १५२५३ या मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता.




